संतांची मराठी भाषानिष्ठा

संतांची मराठी भाषानिष्ठा

           डॉ.रवींद्र बेम्बरे

         मराठी संत परंपरेच्या गुरुस्थानी असणाऱ्या नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांनी सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी जाणीवपूर्वक लोकभाषेचा पुरस्कार केला. लोकभाषेला त्यांनी धर्मभाषा आणि ज्ञानभाषा बनवली. हाच आदर्श समोर ठेवून कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी कन्नड लोक भाषेचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. नाथ संप्रदायातील श्री मुकुंदराजांनी गोरक्षनाथांचा आदर्श नजरेसमोर ठेवून मराठी लोकभाषेचा पुरस्कार केला. मराठी भाषेत लेखन करण्याचा कोणताही वारसा समोर नसताना मुकुंदराजांनी मराठी भाषेत ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. त्यातून 'विवेकसिंधू' हा मराठीतील पहिला पद्यग्रंथ आकारास आला. 'भाषा हो का मऱ्हाटी। परि उपनिषदाचीच राहाटी।।' अशी कबुली मुकुंदराजांनी या ग्रंथात दिली. उपनिषदाच्या मंथनातून निर्माण झालेले  नवनीत म्हणजे 'विवेकसिंधू' हा ग्रंथ होय. यापूर्वी वेदांत आणि अध्यात्मासंबंधीचे सर्व ज्ञान संस्कृतमध्येच सांगण्याची प्रथा होती आणि मुकुंदराज हे स्वतः संस्कृत पंडित होते, असे असूनही त्यांनी जाणीवपूर्वक 'विवेकसिंधू' हा ग्रंथ मराठीतून लिहिला. 'जया नाही शास्त्रीप्रतीती। नेणती तर्कमुद्रेची स्थिती। तेया लागी मऱ्हाटीया युक्ति। केली ग्रंथरचना।।' असा आपला मराठीत ग्रंथ लिहिण्यामागचा हेतू ते स्पष्ट करतात. लोकभाषा मराठी भाषेला ज्ञानभाषा आणि धर्मभाषा बनवून सर्वसामान्य मराठी माणसास ज्ञानी बनवण्याच्या भूमिकेतून मराठीतला हा पहिला ग्रंथ लिहिला गेला. यातून पुढील कवी लेखकांना मराठीतून लेखन करण्याचे बळ मिळाले.

महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म गुजरात प्रांतातला होता. गुजराती, संस्कृत, तेलगू, कन्नड अशा विविध भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व असूनही महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यांच्या पश्चात महानुभाव कवी लेखकांनी अत्यंत निष्ठेने मराठी भाषेतून लेखन केले. गद्य चरित्र ग्रंथाचा एक उतुंग आदर्श ठरलेला 'लीळाचरित्र' म्हणजे महानुभावांच्या मराठी निष्ठेचे फलित आहे. श्री चक्रधर स्वामी नंतर महानुभाव संप्रदायाचे नेतृत्व श्री नागदेवाचार्यांनी केले. त्यांनीही श्री चक्रधर स्वामींची भाषिक भूमिका निष्ठेने जोपासली. त्यांना भेटायला आलेले केशवबास पंडित संस्कृतमध्ये बोलू लागतात. तेव्हा नागदेवाचार्य विलक्षण तळमळीने त्यांना म्हणतात, 'पंडिता : केशवद्या : तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा : मज चक्रधरे निरुपिली मऱ्हाटी : तियाची पुसा:' महानुभावियांच्या मराठीनिष्ठेतून प्रारंभ काळी मराठी साहित्यसृष्टी विविधांगाने बहरली. ज्यांनी यादव राजा रामदेवरायांचे प्रलोभन नाकारून काव्यक्षेत्रात नि:स्पृहतेचा एक उच्चतम आदर्श प्रस्थापित केला अशा कवी नरेंद्र पंडितांनी आपल्या  'रुक्मिणी स्वयंवर' या ग्रंथात मराठी भाषेबद्दल 'ते मऱ्हाटे बोल रसिक वरि दाविन देशियेचे बिक म्हणैन सव्याख्यान श्लोक। मिसे वोवियाचेनी।।' असा मराठीतून ग्रंथ कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास प्रकट केला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.  संत ज्ञानेश्वरांचा 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ भाष्यग्रंथांच्या दृष्टीने वैश्विक मानदंड ठरला. या ग्रंथात त्यांनी 'माझा मराठाचि बोलु कौतिके परी अमृतातेही पैजा जिंके।।' असा सार्थ भाषा अभिमान प्रकट केला.  त्याचबरोबर 'योगवासिष्ठ' मध्ये संत ज्ञानेश्वर मराठीच्या गौरवार्थ  सार अलंकाराचा वापर करतात. जसे दीपामध्ये दीवटी, तिथीमध्ये पौर्णिमा, नदीमध्ये गोदावरी, पर्वतामध्ये रत्नागिरी, फुलांमध्ये कमळ, सुगंधामध्ये कस्तुरी, तीर्थामध्ये काशी, वृत्तामध्ये एकादशी तशी सर्व भाषांमध्ये मराठी शोभिवंत असल्याचे त्यांनी सांगितले. संत नामदेवांनी अभंग छंद मराठीत रूजवला. अभंगातून आपले आत्मचरित्र आणि ज्ञानेश्वरादी भावंडांचे चरित्र मांडण्याचा पहिला प्रयत्न केला. हजारो वर्षापासून शिक्षणाचा गंध नसलेल्या अठरापगड जातीतील स्त्री-पुरुषांना वारकरी संप्रदायात एकत्र आणून मराठीतून व्यक्त होण्याचे बळ संत नामदेवांनी दिले. यातूनच वारकरी संत साहित्याची एक अखंडित परंपरा निर्माण झाली.

समाजातला प्रत्येक स्तर नजरेसमोर ठेवून बहुविध प्रकारचे साहित्य लेखन संत एकनाथांनी  केले. मराठी भाषिक लोकांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने 'संस्कृत वंद्य आणि मराठी निंद्य' ही पारंपरिक धारणा त्यांनी धुडकावून लावली. 'संस्कृत भाषा देवे केली प्राकृत काय चोरापासून झाली?।।' कपिलेचे ते दूध आणि इतर गायीचे पाणी असते काय? असे प्रश्न उपस्थित करून संस्कृतचे भाषिक वर्चस्व त्यांनी स्पष्टपणे नाकारले. आपल्या भागवतामध्ये 'माझी मराठी भाषा चोखडी परब्रम्हे फळली गाढी ' अशा शब्दात त्यांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. 'हे टीका तरी मराठी परी ज्ञानदाने होईल लाठी।।' असा मराठीतून भाष्यग्रंथ लेखनाबद्दलचा दृढ आत्मविश्वास त्यांनी प्रकट केला. संत एकनाथ पंचकातील त्र्यंबकराज आपल्या 'बालबोध' या ग्रंथात 'धन्य धन्य हे मऱ्हाटी ब्रह्मविद्येची कसवटी हा द्वार शिलेच्या पोटी। परिसु जोडीला ।।' अशा तऱ्हेने मराठीला ज्ञानभाषेची प्रतिष्ठा देतात. संत तुकारामांनी अत्यंत निष्ठेने मराठी शब्दांची उपासना करून लिहिलेले अभंग हे मराठी भाषा आणि संस्कृतीचे परमवैभव ठरले आहेत. संत रामदासांनी आपल्या दासबोध या ग्रंथातील सातव्या दशकामध्ये मराठी भाषेचा पुरस्कार करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. 'येक म्हणती मऱ्हाटें काये हें तों भल्यांसि ऐकों नये। तीं मूर्खें नेणती सोये। अर्थांन्वयाची।।' आपण मराठीत दासबोध हा ग्रंथ का लिहिला म्हणून कोणी संस्कृत भाषाअभिमानी नाक मुरडत असतील तर त्या मूर्खांना मराठीतला अर्थ भेद काय कळणार ? असे संत रामदास म्हणतात. सकल समाजापर्यंत आपले विचार ज्या भाषेतून पोहोचतात त्याच भाषेचा पुरस्कार केला पाहिजे ही रामदासांची भूमिका आहे. म्हणून ते मराठी भाषेचा आग्रह पुरस्कार करतात.

दत्त संप्रदायातील दासोपंत या कवींनी व्रतस्थपणे प्रदीर्घ स्वरूपाचे लेखन केले. त्यांनी आपल्या 'गीतार्णव' या ग्रंथात संस्कृत बरोबर मराठी भाषेची तुलना करताना  'संस्कृते घटु म्हणती। तया घटांचे भेद सांगावे किती' अशी मराठी भाषेची समृद्धी प्रकट केली. मातीच्या भांड्यासाठी संस्कृत मध्ये एकच 'घट' असा एखाददुसरा शब्द आहे. मराठीत मात्र आकार आणि प्रकारानुसार अनेक खास शब्द आहेत. मराठीत घटाचे किती प्रकार सांगावेत? असे दासोपंत म्हणतात. मराठी भाषेचा गौरव केवळ मराठी भाषा पुत्रांनीच केला; असे नसून सातासमुद्रा पलीकडून आलेल्या फादर स्टीफन्स हे ख्रिश्चन संत 'क्रिस्तपुराणा' मराठीचा गौरव करताना म्हणतात, 'जैसा हरळामाजी रत्नकीळा की रत्नांमाजी हिरा निळा तैसी भासांमाजी चोखळा   भासा मराठी ।। जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी   की परीमळामाजी कस्तुरी तैसी भासांमाजी साजिरी मराठीया।।' यातून त्यांचे मराठी प्रेम अधोरेखित होते. उर्दू, फारसी, अरबी भाषिक सुफी संत आणि कन्नड भाषिक लिंगायत संतांनी अत्यंत निष्ठेने मराठीतून लेखन करून मराठी साहित्याच्या वैभवात मोलाची भर घातली. संत रामदासांनी परमार्था बरोबरच प्रपंच ज्ञानाची मांडणी करून मराठी संत साहित्याची कक्षा रुंदावली. महाराष्ट्राच्या भूमीतील विविध संप्रदायाच्या संतांनी निष्ठेने आणि आत्मविश्वासाने मराठीतून लेखन करून मराठी भाषा सर्वांगाने समृद्ध बनवण्याचा अव्याहत प्रयत्न केला.

      सकल मराठी समाजाचा उद्धार करण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील संतांनी मराठी लोक भाषेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला आहे. वेदांतातील तत्त्वज्ञान मराठीतूनच सर्व लोकांपर्यंत पोहचू शकते हे लक्षात घेऊन मुकुंदराजाने विवेकसिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला. सर्वसामान्य मराठी माणूस नजरेसमोर ठेवून महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेचा पुरस्कार केला. त्यातून मराठी गद्य पद्य साहित्याची पायाभरणी झाली.  महाराष्ट्रात ब्रह्म विद्येचा सुकाळ करण्याच्या भूमिकेतून संत ज्ञानेश्वरांनी मराठीतून लेखन केले. मराठी भाषेबद्दलचा सार्थ अभिमान त्यांनी प्रकट केला. संस्कृत श्रेष्ठ आणि मराठी कनिष्ठ ही रूढधारणा धुडकवून लावत संत एकनाथ आणि संत रामदासासारख्या संतांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. दत्त संप्रदायिक कवी दासोपंतांनी संस्कृत पेक्षा मराठी  समृद्ध असल्याचे सप्रमाण स्पष्ट केले आहे. सात समुद्राच्या पलीकडून आलेले फादर स्टीफन्स यांनी मराठी भाषेचा केलेला उचित गौरव प्रत्येक मराठी माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला होणार आहे.

टिप्पण्या

  1. महाराष्ट्रात उदयास आलेले विविध भक्ती संप्रदाय आणि या संप्रदायातील संतांनी मराठी भाषेतून रचना करून ही भाषा अधिक समृद्ध आणि विस्तारशील केली. यासाठी दिलेले योगदान यातून स्पष्ट होते; तसेच सर्व भक्ती संप्रदायांनी मराठी भाषेचा स्वीकार करून तिचे संघटनात्मक पातळीवर केलेले उपयोजन किती महत्त्वाचे होते हेही ध्यानात घेण्यासारखे आहे.
    लेख विचारप्रवर्तक झाला आहे याबद्दल डॉ. बेंबरेसरांचे हार्दिक अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  2. So proud,, सरजी आपला लेख वाचून मराठी भाषेची श्रीमंती सातासमुद्रापार होती... माझी मराठी... माझा अभिमान 💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. आदरणीय डॉ.बेंबरे सर आपला लेख वाचून खूप अभिमान वाटला.
    आपली मराठी समृद्ध भाषा करण्यासाठी आपल्या संतांनी खूप मोलाचे प्रयत्न केलेले आहेत.
    अगदी साता समुद्र पलीकडून आलेल्या फादर स्टीफन्स या ख्रिश्चन संतांनी मराठी भाषेचा गौरव करावा यापेक्षा अधिक काय हवं आहे...
    आपले खूप अभिनंदन सरजी 💐

    उत्तर द्याहटवा
  4. अभिनंदन सर, अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिलात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा