संतांची शिक्षणदृष्टी

  संतांची शिक्षणदृष्टी 

          डॉ.रवींद्र बेम्बरे  

               संत हे लोकशिक्षक असल्यामुळे त्यांच्या कृती आणि उक्तीतून एक अनौपचारिक शिक्षणशास्त्र प्रकटले आहे. अराजकतेत अडकलेल्या वर्तमान शिक्षण व्यवस्थेला एक सम्यक दिशा देण्याचे सामर्थ्य संतांच्या या शिक्षणशास्त्रात निश्चितच आहे. सर्वसामान्य लोकांच्या लोकभाषेला ज्ञानभाषा बनवून ज्ञानाची दारे त्यांनी सर्वांसाठी खुली केली. संतांच्या शिक्षणनीतीला लोककळवळ्याचे अधिष्ठान होते. 'यारे यारे लहान थोर' असा नारा देत समाजातील सर्व घटकांना शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्याचा संदेश दिला. स्वतःला यथार्थपणे ओळखणे हा शिक्षणाचा आरंभबिंदू ठरतो या दृष्टीने संतांनी आत्मशोधाची दिशा दाखवली. मानवतेचा स्तर उंचावण्यासाठी उदात्त मूल्यांचे दर्शन घडवले. आपल्यातील सुप्त सामर्थ्याचा शोध घेत स्वतःला घडवण्याची दृष्टी संतांनी दिली. वर्तमान शिक्षणव्यवस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना संतांची शिक्षणदृष्टी आज पदोपदी मार्गदर्शक ठरते.


          जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा सर्वार्थाने अद्वितीय असतो. या अद्वितीयत्वाला हळुवारपणे फुलवणारी शिक्षणव्यवस्था असायला हवी. पण दुर्दैवाने आपल्या शिक्षणातून एकाच साच्याचा गणपती बनवण्याचा जो अट्टाहास चालू झाला, त्यातून नैसर्गिक निराळेपण मारले जात आहे. 'तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा ।।' या उक्तीप्रमाणे निसर्गदत्त मूळ गुणवत्ता महत्त्वाची असून त्याच्या विकासासाठी शिक्षणव्यवस्था पोषक असायला हवी. आज सर्वच पालकांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्याची अति घाई झाल्यामुळे त्यातून शिक्षण क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आली. आपल्या मुलाची कुवत आणि कल विचारात घेता शेजाऱ्याकडे पाहून मुलाचा अभ्यासक्रम निवडला जात आहे. यात मुलांची नैसर्गिक गुणवत्ता चिरडली जात आहे. 'अधिकार तैसा करावा उपदेश। साहे ओझें त्यास तें चि द्यावे मुंगीवरी भार गजाचें पालाण घालितां ते कोण कार्यसिद्धी।।' या अभंगात संत तुकाराम ग्रहणक्षमता लक्षात घेऊन शिक्षण देण्याचा विचार मांडतात. हत्तीचा आहार मुंगीच्या मुखात कोंबण्याचा प्रयत्न केला तर ती मुंगी गुदमरून मरण्याचा धोका असतो. इयत्ता पहिलीतील मुलासाठी नीट आणि आय.आय.टी.फाउंडेशनचा अट्टाहास पाहिल्यानंतर विद्यार्थ्याबरोबरच आजच्या शिक्षण व्यवस्थेचीही किव येते. 'जे सायासें स्तन्य सेवी ते पक्वानें केवीं जेवी। म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं धनुर्धरा।।' ज्ञानेश्वरीतील या ओवीतून बालकाच्या कुवतीला अनुसरून शिक्षण देण्याचा संदेश मिळतो.
            शिकणारी व्यक्ती ही शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असावी. मुलांचा कल पाहून त्याच्याशी समरस होत शिक्षण दिले पाहिजे ही संत रामदासांची आग्रही भूमिका आहे. 'मुलाच्या चालीने चालावे। मुलाच्या मनोगते बोलावे। तैसे जनासी सिकवावे। हळूहळू।।' शिक्षकांच्या दृष्टीने हा विचार खूप मोलाचा ठरतो. शिक्षणात कोणतीही जबरदस्ती नसावी. विद्यार्थ्याच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे. प्रत्येक माणसाकडे जशा काही जमेच्या बाजू असतात तशा काही उणिवाही असतात ही बाब स्वीकारणे शहाणपणाचे ठरते. माणसाच्या उणिवावर बोट ठेवत त्याचा आत्मविश्वास मारणारी शिक्षणव्यवस्था कदापि नसावी. 'वेड्यास वेडे म्हणो नये। वर्म कदापि बोलो नये।' असे संत रामदास बजावून सांगतात. विद्यार्थ्यांमधील दोष आणि उणिवांचे भांडवल करत बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे वाटचाल  करणे अधिक हिताचे असल्याचे ते सांगतात.
          प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारे असंख्य विद्यार्थी जीवनात मात्र सपशेल नापास होताना दिसतात. कारण आपल्या साऱ्याच परीक्षा या निव्वळ स्मृतीच्या परीक्षा आहेत 'शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान। दरपणीचे धन उपर वाया ।।'  पाठांतरप्रधान शिक्षण म्हणजे  निवळ आरशातील धन असल्याचे संत तुकाराम नमूद करतात. आपल्या परीक्षा खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेच्या किंवा इंटलिजन्सच्या परीक्षा नाहीत. जीवनातील प्रश्न परीक्षेप्रमाणे ठरीव साच्याची नसतात जीवन रोज नवे प्रश्न उभे करीत असते. जीवनात वेळोवेळी उद्भवणाऱ्या नवनवीन प्रश्नांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी अनुभूतीप्रधान शिक्षणाचे महत्त्व संत प्रतिपादित करतात. शिक्षकाच्या प्रत्येक शब्दाला कृतीचे अधिष्ठान असले पाहिजे तरच ते शिक्षण विद्यार्थ्यांना कृतिप्रवण बनवते. 'बोलण्यासारखे करणे। स्वयेकरूनी मग बोलणे। तयाची वचने प्रमाणे। मानती जनी।।' क्रियेवीण वाचाळता व्यर्थ असल्याचे संत रामदास सांगतात.  केवळ पोपटपंची शिक्षणातून काहीच साध्य होत नाही. बोलाचीच कढी आणि बोलाच्याच भाताने कोणाचेही पोट भरत नाही. कागदावर साखर शब्द लिहून ती चाटली तर साखरेची गोडी कळेल का ? असा प्रश्न उपस्थित करत संत तुकाराम शाब्दिक पंडित्यापेक्षा अनुभूतीला अधिक महत्त्व देतात. 
            केवळ पालकच मुलाच्या अभ्यासाचा ताण घेऊन काहीही निष्पन्न होत नाही. ज्याला शिकायचे आहे त्या मुलांमध्येच तीव्र ज्ञानलालसा असली पाहीजे. 'मुंगीचिया घरा कोण जाये मूळ देखोनिया गुळ धाव घाली।।' मुंगीच्या घरी जाऊन कोणी गूळ खायला या असं निमंत्रण देत नाहीत. तीच गुळाचा शोध घेत गुळापर्यंत पोहचते. त्याचप्रमाणे जो तो आपापल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळून त्यात परमोच्च प्रगती साधली पाहिजे हा संत तुकारामांचा दृष्टिकोन आजच्या विद्यार्थ्यासाठी खूप मोलाचा ठरतो. शिक्षणातून विवेक रूजावा, शिक्षण चिकित्सक वृत्तीला पोषक असावे आणि विद्यार्थ्यांना खुलेपणाने प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. शिक्षकांच्या भीतीने प्रश्न विचारता थांबल्यास ज्ञान निर्मितीची प्रक्रियाच थांबते असे निरीक्षण संत रामदास नोंदवतात. ज्ञान पचवून त्याचे योग्य उपयोजन करण्यावर संतांनी भर दिला. शिक्षणातून शहाणपणाचे संवर्धन होणे संतांना अपेक्षित होते. संतांच्या विचारापासून आपली शिक्षणव्यवस्था लांब गेल्यामुळे पदव्यांचा सुकाळ आणि शहाणपणाचा दुष्काळ आज जाणवतो. या पार्श्वभूमीवर सुजनशील, सुजान आणि समृद्ध माणूस घडवण्याच्या दृष्टीने संतांचे शिक्षणशास्त्र आज दिशादर्शक ठरते.



भ्र. दू.९४२०८१३१८५

Email Id - rvbembare@gmail.com



 


टिप्पण्या

  1. सरजी आपण मांडलेले संतांची शिकवण हा लेख अतिशय मनापासून आवडला... आजची शिक्षण व्यवस्था ही संतान पासून कोसो दूर जात आहे त्यामुळेच की काय सध्या शिक्षण क्षेत्रात उदासीनता दिसून येत आहे.. 🙏🌹👍👌

    उत्तर द्याहटवा
  2. सर असेच उत्तम लेखन करून आमच्या ज्ञानात भर टाकत रहा🙏 शब्दांची उत्तम मांडणी 👌

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम. आताच्या काळातले तथ्य मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. खरेच गुरुवर्य प्रा.डॉ.रविंद्रजी.. आपण मांडलेले संत दर्शन सद्ध्याच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. सांतविचारातील लोकशिक्षणाचा मार्ग सोप्या पण प्रभावी भाषेत मांडलात. सादर दंडवत!

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय उत्तम लेख आहे. सर आपण संताची नैसर्गिक गुणवत्ता वर्धक भुमिका चांगली मांडली . अभिनंदन प्रा.डॉ रविंद्र बेंबरे सर 🙏🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा