संतांची संवाददृष्टी

संतांची संवाददृष्टी

प्रा.डॉ.रवींद्र बेम्बरे

        माणसाला माणूस जोडण्याचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजे संवाद आहे. मानव जातीच्या  उत्कर्षाची मूळं संवादामध्ये सापडतात. भारतीय संतांनी कुळ, जात, वर्ण, लिंग, पंथ, प्रांत, देश या सर्व  भेदभावाच्या सीमा ओलांडून वेळोवेळी  समाजात संवाद प्रस्थापित केला. एक उन्नत संवाद काय असतो ?  याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. पण आजसंवादाचा अभावकिंवा ‘lack of communication’  हा एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. माध्यमांच्या क्रांतीमुळे संवादाची साधने अमर्याद वाढली आहेत. जग जवळ आले; पण माणसातला अंतर मात्र उत्तरोत्तर वाढतोच आहे. संवादाची अतिप्रगत माध्यमे हातात  आली तरी संवादा ऐवजी विवादच वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर  संतांची संवाददृष्टी समजून घेणे उचित ठरते.
           भारतीय संत परंपरेचा मागोवा घेत असताना गोरक्षनाथानंतर महात्मा बसवेश्वरांनी संवादाचा सर्वोच्च आदर्श प्रस्थापित केला. बाराव्या शतकात संवादाच्या भक्कम पायावर अनुभव मंटपाच्या रूपाने बसवेश्वरांनी जगातले पहिले लोकसंसद उभे केले. दळणवळणाची फारसी साधनं नसताना देश विदेशातील सातशे सत्तर विवेकी स्त्री-पुरुषांना अनुभव मंटपात एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण केला. आपल्या सोबत कुणाचा संवादच नसेल तर जगणे निरर्थक असल्याचे बसवेश्वर त्यांच्या कन्नड वचनात सांगतात. उत्तम संवाद प्रस्थापित होण्यासाठी आपल्या उक्ती बरोबरच कृतीमध्येही विनय असणे त्यांना महत्त्वाचे वाटते. सम्यक संवादातून समाज सर्वार्थाने उन्नत होतो यावर बसवेश्वरांचा विश्वास असल्यामुळे मृदू बोलणे म्हणजे जप आणि मृदू बोलणेच तप असल्याचे ते सांगतात. 'अहो म्हणणे स्वर्ग आणि आरे म्हणणे नर्क' या वचनातून संवादातील मृदूतेचे महत्व ते अधोरेखित करतात. बोलणे कसे असावे ? यासंदर्भात बसवेश्वर एका वचनात म्हणतात, 'बोलणे मोत्याच्या हाराप्रमाणे असावे / बोलणे माणकाच्या दीप्तीप्रमाणे असावे / बोलणे स्फटिकांच्या किरणासम असावे' म्हणजेच बोलण्यामध्ये एक सुसंगती असावी, बोलणे सत्य सुंदर असावे, शब्दाच्या तेजाने जीवन उजळून निघाले पाहिजे, बोलणे निर्मळ कपटरहित असावे. संवाद अर्थपूर्ण होण्यासाठी उक्तीला कृतीची जोड असावी यावर बसवेश्वर भर देतात. 
           महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी शारीरिक हिंसे बरोबरच संवादातून होणारी मानसिक हिंसा देखील वर्ज्य मानली. संत नामदेवांनी आपल्या संवाद कौशल्याने अठरापगड जातीतील स्त्री-पुरुषांना वारकरी संप्रदायाच्या ध्वजाखाली एकत्र आणले. वारकरी संप्रदायाचा पंढरपूर पासून ते पंजाब पर्यंत जो प्रसार केला त्यामागे त्यांचे संवाद कौशल्य आहे. आपल्या शब्दाने परमात्मा विठ्ठल देखील प्रसन्न होऊन आनंदाने डोलणार असल्याचा आत्मविश्वास नामदेव 'बोलूं ऐसें बोल जेणें बोलें विठ्ठल डोले।।' या अभंगात प्रकट करतात.  संवाद कसा असायला पाहिजे ? यासंदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये मौलिक स्वरूपाचे चिंतन आले आहे. बोलावे कसे ? या संदर्भात संत ज्ञानेश्वर म्हणतात, 'तैसें साच आणि मवाळ। मितले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।' आपले बोलणे सत्य असले तरी ते मवाळच असले पाहिजे यावर ज्ञानेश्वरांचा कटाक्ष आहे.  सत्य हे कटू असते, असे म्हटले जात असले तरी ते गोड शब्दात व्यक्त करता येते हा ज्ञानेश्वरांचा विश्वास आहे. बोलणे इतके मधुर असावे की, आपल्या शब्दाशब्दातून अमृताचे कल्लोळ निर्माण झाले पाहिजेत असे ज्ञानेश्वर म्हणतात. संवादातला गोडवा जपण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याचे तपशीलवार विवेचन ज्ञानेश्वर करतात. बोलण्यात विरोध, वादावादी, प्रणितापढाळु म्हणजे संतापजनक वक्तव्य, उपहासात्मक, छळ करणारे, वर्मावर घाव घालणारे, आटु म्हणजे आडवणूक करणारे, विंदाणु म्हणजे कपटपूर्ण, आशाळभूतपणाचे शंका घेणारे किंवा दुसऱ्याची प्रतारणा करणारे हे सर्व अवगुण टाळून संवाद साधायला सांगतात. आपल्या बोलण्या वागण्यात हळुवारपणा कसा असावा ? ते नमूद करताना ज्ञानेश्वर भ्रमर आणि कमळाचा अगदी मार्मिक दृष्टांत योजतात. 'का कमळावरील भ्रमर। पाय ठेविती हळुवार। कुचंबैल केशर। इया शंका।।' संवाद साधत असताना हा हळुवारपणा जपला तर सकल भूतमात्रा सोबत मैत्रभाव वृद्धिंगत व्हायला  वेळ लागत नाही.
         संवादासाठी बोलणे महत्त्वाचे असले तरी गरजेपेक्षा अधिक बोलणे देखील समस्या निर्माण करणारे असते. काही वेळा मौनातूनही खूप अर्थपूर्ण संवाद होतो. संवादासाठी प्रत्येक वेळा बोललेच पाहिजे असे नाही. संवाद नजरेतून होतो, स्पर्शातूनही होतो. आई मुलाच्या पाठीवर हात ठेवते तो स्पर्श कोणत्याही संवादाच्या पलीकडचा असतो. विनाकारण स्तुती, निंदा, आणि वितंडवाद या गोष्टी संवादातील अडथळे असल्याचे संत एकनाथ आपल्या भागवतात सांगतात. 'एवं स्तुती निंदा वाग्वाद करिता खुंटला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधला।।' निरर्थक बडबड करून समस्या वाढवण्यापेक्षा मौन अधिक सोयीचे असल्याचे एकनाथ नमूद करतात. मौन केव्हा पाळायला हवे ? त्याचे फायदे काय ? याचे तपशीलवार विवेचन शिवयोगी मन्मथ स्वामींनी आपल्या 'परमरहस्य' या ग्रंथात केले आहे. पारमार्थिक उपदेश करत असतानाही कोणाचे चित्त दुखावले जाणार नाही याची खबरदारी घ्यायला मन्मथ स्वामी सांगतात.
           संवाद म्हणजे केवळ बोलणे नसून बोलणे आणि ऐकणे याचे एकत्रीकरण आहे. काही व्यक्ती समोरच्याचं काहीच ऐकता फक्त बोलत सुटतात. अशांचे बोलणे हे कंटाळवाणे आणि कटकटीचे ठरते. 'फट्याचे बडबडे चवी ना सवाद' अशा शब्दात निरर्थक बडबड करणाऱ्या लोकांची निर्भत्सना संत तुकारामांनी केली आहे. मौलिक संपत्ती आणि धारदार शस्त्र या दोन्ही रूपात तुकाराम शब्दांकडे पाहतात आणि ते जपून वापरण्याचा सल्ला देतात. कठोर शब्द उच्चारते वेळेस आपल्या जिभेला तिखट लागत नसले तरी समोरील व्यक्तीच्या मनावर तीव्र आघात होत असल्याची जाणीव तुकाराम करून देतात. शब्दाला हात पाय नसले तरी तो शब्द जखमही करू शकतो आणि झालेली जखम भरून काढण्यासाठी औषधही बनू शकतो, असे शब्दाचे दुधारी स्वरूप कबीरांच्या दोह्यातून निदर्शनास येते. तोंडात दात बत्तीस असले तरी जीभ एकच आहे; पण जीभ वाकडी चालली तर बत्तीस दात लागलीच पडतात असेही कबीर सांगतात. अनेक लोकांच्या सहज बोलण्यातही वारंवार 'मी' पणा डोकावत असतो. हा 'मी'पणा संवादातला सर्वात मोठा अडथळा असल्याचे जाणून संतांनी 'माझिया मी पणावर पडो हे पाषाण। जळो हे भूषण नाम माझे।।' अशी प्रार्थना केली आहे.
           ज्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे तोच माणूस सार्वजनिक जीवनात यशस्वी होऊ शकतो हा समर्थ रामदासांचा विश्वास आहे. आपल्या संवादातून 'राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे।।' असे ते सांगतात. जगात विविध वृत्ती प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्याकडून अपमान होत असला तरीही आपण मात्र शांत मनाने नम्र बोलून समोरच्या माणसास शांती आणि तृप्ती द्यावी असा उपदेश समर्थ मनाच्या श्लोकातून करतात. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने समर्थांचे हे संवादसूत्र खूप महत्त्वपूर्ण आहे. बरे बोलून सुख वाटत असेल तर कर्कश बोलण्याची गरजच काय ? असा प्रश्न समर्थांनी उपस्थित केला. कसे बोलावे ? आणि कसे बोलू नये यासंबंधी समर्थांनी दासबोधात विस्ताराने सांगितले आहे.  'जनी वादविवाद सोडूनि द्यावा। जनी सुखसंवाद सुखे करावा। जगी तोचि तो शोक संतापहारी। तुटे वाद संवाद तो हितकारी।।' अशा ओवीतून त्यांचे संवादशास्त्र प्रकटले आहे. वाद टाळून संवाद प्रस्थापित करण्यावरच मानव जातीचे हित असल्याचे समर्थांनी ठिकठिकाणी नमूद केले आहे. तुसडेपणाचा त्याग करून प्रेम आणि विश्वासाच्या पायावर आधारलेली मैत्री कायम जपावी हा समर्थांचा संदेश आहे. संवादातून माणूस जोडण्यासाठी 'कोमल वाचा दे रे राम' अशी प्रार्थना ते करतात. मधुर वाणी, विनयी स्वभाव संघटना बांधणीचे सूत्र असल्याचे समर्थ प्रतिपादित करतात. 'मानसपूजा' या प्रकरणात आपल्या शिष्यांना उपदेश करताना ते म्हणतात, 'नासला फड नेटक्या वचनांनी सावरावा क्षणभरही कोप नसावा।।' तुटलेली आणि फाटलेली मने देखील संवादातून सांधता येतात या गोष्टीवर समर्थांचा दृढ विश्वास आहे.
           जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य ही महत्त्वपूर्ण गरज आहे. संवादामुळे भावनिक गुंतवणूक वाढते. जीवन खऱ्या अर्थाने सुखी आणि आनंदी बनते. आज संवाद कमी होत चालल्याने माणसे एकलकोंडी,एककल्ली,आत्ममग्न बनत आहेत आणि त्याचे पर्यावसान नैराश्य, वैफल्य, भयगंड अशा विविध मानसिक आजारात होत आहे. या पार्श्वभूमीवर संतांची संवाददृष्टी दिशादर्शक ठरते.
भ्र. दू. 9420813185 
-मेल - rvbembare@gmail.com

टिप्पण्या

  1. खूप छान व ज्ञानात भर टाकणारी माहिती👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान ज्ञानवर्धक लेख आहे , आम्ही आपल्या लेख ची आतुरतेने वाट पाहतो.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम व दर्जेदार लेखन व माहिती सर
    खुप छान 👌

    उत्तर द्याहटवा
  4. खरे आहे सर,संवाद घडणे हे आजच्या काळाची खूप गरज आहे !खूप छान सर 👌

    उत्तर द्याहटवा
  5. ज्ञानवर्धक ब्लॉग... खूप उपयुक्त! 🙂👌👌🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा